Advertisement Advertisement

नजर कुणाची हो लागली! चिखली तालुक्यातील त्या गावातील सामूहिक विवाहाची आदर्श परंपरा खंडित…! कोणते गाव आहे वाचा बातमी….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : एकेकाळी सामाजिक ऐक्य, साधेपणा आणि लोकसहभागाचा आदर्श ठरलेल्या चिखली तालुक्यातील कोलारा, दिवठाणा आणि अंचरवाडी येथील सामूहिक विवाह सोहळ्यांची परंपरा आता इतिहासजमा झाली आहे. तब्बल पन्नास वर्षे अखंड सुरू राहिलेला हा सामाजिक उपक्रम गावातील मतभेद, मानापमान आणि राजकारणाच्या विळख्यात अडकून २०१३ पासून पूर्णपणे बंद पडला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीचा आदर्श मानली जाणारी ही परंपरा पुन्हा सुरू व्हावी, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

कोलारा येथील नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धेश्वर महाराज संस्थान परिसरात दरवर्षी भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात असे. “गाव करी ते राव ना करी” ही म्हण प्रत्यक्षात उतरवत गावकऱ्यांनी सर्व विवाह एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी लावण्याची अभिनव परंपरा सुरू केली होती. या उपक्रमामुळे केवळ खर्चात बचत झाली नाही, तर सामाजिक ऐक्याचीही मजबूत वीण तयार झाली होती.

सुरुवातीला हा उपक्रम फक्त कोलारा गावापुरता मर्यादित होता. मात्र त्याची कीर्ती राज्यभर पोहोचली. सन २००२ मध्ये तत्कालीन खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी या सोहळ्याची माहिती घेतल्यानंतर विवाह खर्चाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या सहकार्यामुळे पहिल्याच वर्षी तब्बल १०१ जोडप्यांचे विवाह मोठ्या उत्साहात पार पडले. त्यानंतर २०१३ पर्यंत हजारो विवाह या सामूहिक सोहळ्यात संपन्न झाले. गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरला होता.

या आदर्शाचा प्रभाव इतका होता की दिवठाणा आणि अंचरवाडी गावांनीही सामूहिक विवाहाची परंपरा सुरू केली. मात्र कालांतराने अध्यक्षपद, मानापमान आणि वर्चस्वाच्या राजकारणामुळे गावांमध्ये मतभेद वाढले. सामाजिक एकोप्याचे प्रतीक असलेली ही चळवळ हळूहळू बंद पडली आणि अखेर पन्नास वर्षांची उज्ज्वल परंपरा खंडित झाली.

आजच्या काळात लग्न समारंभ म्हणजे मोठा आर्थिक बोजा बनला आहे. डीजे, जेवणावळी, दिखावा आणि विविध प्रथांमुळे लाखो रुपयांचा खर्च होत असून अनेक गरीब कुटुंबांना मुलीचे लग्न करताना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. काहींना जमिनी विकण्याची वेळ येते, तर कर्जाच्या ओझ्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची उदाहरणेही समोर आली आहेत.

याउलट, कोलारा येथील सामूहिक विवाह सोहळा हा साधेपणा, सामाजिक एकता आणि खर्चाला लगाम घालणारा आदर्श उपक्रम होता. त्यामुळे बदलत्या काळात पुन्हा अशा परंपरा सुरू होण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.

राजकारणामुळे आदर्श परंपरेला खीळ….

चिखली तालुक्यातील कोलारा येथील राजपूत समाजाने जवळपास पन्नास वर्षांपूर्वी सामूहिक विवाहाची परंपरा रुजवली होती. २००२ पासून माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी या उपक्रमाला आर्थिक बळ देत मोठी साथ दिली. मात्र समाजातील काही लोकांनी या उपक्रमात राजकारण आणल्याने गावाचा नावलौकिक वाढवणारी ही आदर्श परंपरा अखेर बंद पडली. आजही अनेक ज्येष्ठ नागरिक या परंपरेच्या आठवणी काढत हळहळ व्यक्त करताना दिसतात.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!