देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील देऊळगाव मही येथे एका महिलेच्या घरात मध्यरात्री घुसून मारहाण व विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रभाकर उत्तम खिल्लारे (रा. देऊळगाव मही) याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप नं. १३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४, ३५१(२), ३५१(३) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी घडली. फिर्यादी घरी झोपलेल्या असताना दरवाजावर आवाज आल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता आरोपी दारात उभा होता. “तू मला आधी जेलमध्ये का टाकले?” असा जाब विचारत आरोपीने फिर्यादीला घराबाहेर ओढले व तिच्यावर वाईट उद्देशाने हात घालून विनयभंग केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, फिर्यादी व तिच्या मुलांनी आरडाओरडा केल्याने आरोपीने शिवीगाळ करत “तुम्हाला पाहून घेतो” अशी धमकी दिली व घटनास्थळावरून पळ काढला.
विशेष म्हणजे, यापूर्वीही दोघांमध्ये शेतीच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती असून आरोपीवर पूर्वीही गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.
सदर प्रकरणी ३ एप्रिल रोजी दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस हवालदार नायबराव मोगल यांनी फिर्याद नोंदवली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कलीम देशमुख करीत आहेत.













