शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेगाव तालुक्यातील पाडसुळ येथे एका विवाहितेचा चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाडसुळ येथील पुजा भगवान बिलेवार (वय २५) यांचा विवाह भगवान प्रकाश बिलेवार याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींकडून पुजाला किरकोळ कारणांवरून त्रास देण्यास सुरुवात झाली.
२० मार्च २०२६ रोजी तसेच यापूर्वीही आरोपींनी संगनमत करून पुजाचा मानसिक छळ केला. “तुला नांदवणार नाही”, “तू बदमाश आहेस” असे म्हणत तिचा अपमान करण्यात आला. तसेच “तुझ्या दोन्ही मुलींना घेऊन घर सोडून जा, मला फारकत दे” अशी मागणी करत तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी आरोपींनी पुजाच्या चारित्र्यावर संशय घेत तिला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली व अश्लील शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पुजा बिलेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी भगवान प्रकाश बिलेवार (पती), प्रकाश पुंजाजी बिलेवार (सासरे) आणि सतीश प्रकाश बिलेवार (दीर), सर्व रा. पाडसुळ (ता. शेगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज माने करीत आहेत.














