दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पाडव्याच्या दिवशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली असून कडबा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूमराळा येथील बिना नंबरचे ट्रॅक्टर गुरुवारी कडबा घेऊन साखरखेर्डा दिशेने जात होते. यावेळी समाधान दळवी हे भूमराळा हा युवक चालकाच्या बाजूला बसलेला होता. दरम्यान मलकापूर पांग्रा येथील नेहरू विद्यालयासमोर पाईपलाईनसाठी खोदलेल्या नालीवरून ट्रॅक्टर जात असताना ट्रॅक्टर जोरात उसळले.
या उसळीमुळे समाधान दळवी हा खाली पडला आणि ट्रॅक्टरच्या पुढील मोठ्या चाकासोबत घासत गेला. या भीषण अपघातात त्याच्या पोटाला व डोक्याला गंभीर मार लागला.
अपघातानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी बीबी येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती त्याचा भाऊ भगवान दळवी यांनी दिली.













