धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) धाड येथे २ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान गायत्री पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात दीपक गणेश गायकवाड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला असून, धडक इतकी तीव्र होती की दीपक सुमारे ५० फुटांपेक्षा अधिक अंतरावर फेकला गेला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
स्थानिक बोराडेनगर येथील रहिवासी असलेला दीपक गायकवाड हा सैलानी येथे जाऊन परत येत होता. ढालसावंगीहून धाडकडे येत असताना भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक बसताच संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.
रस्त्यावर आढळलेल्या टायरच्या खुणा व प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहन अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच धाड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून नागरिकांच्या मदतीने दीपकचा मृतदेह शासकीय रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.
दीपकच्या आकस्मिक निधनाने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, परिसरात अवैध वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, दोषी वाहनचालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याप्रकरणी धाड पोलिसांकडून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.















