रायपुर (बुलडाणा कव्हरेज न्युज):‘हर घर जल – हर घर नल’ आणि ‘प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी’ या शासनाच्या योजनांची अंमलबजावणी रायपूर (ता. बुलढाणा) येथे प्रभावीपणे होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला. पाणी मुबलक असतानाही गावात वर्षभर पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
रायपूरपासून जवळच असलेल्या पळसखेड भट येथील तलावात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. या तलावावरून पाणीपुरवठा योजनेद्वारे रायपूरला पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या योजना प्रभावी ठरत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी नागरिकांना दोन-दोन महिने पाणी मिळत नाही.
महाजल योजनेवर ३ कोटी ८७ लाख रुपये, जलजीवन मिशन योजनेवर ४ कोटी २५ लाख रुपये तसेच ग्रामपंचायतीमार्फत १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे २ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या कोट्यवधी रुपयांच्या खर्चानंतरही एकही योजना पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. खर्च झालेल्या निधीची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, पळसखेड भट येथून रायपूरकडे टाकण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीला काही ठिकाणी फोडून त्यावर मोठे नळ बसवून सिंचनासाठी पाणी वापरले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यामुळेही पाणीटंचाई निर्माण होत असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागावर काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व अमोल पाटील यांनी केले. मोर्चात नलूबाई पाटील, दीपाली सोनुने, विद्या सिरसाट, इंदुबाई सोनुने, मंगला सिरसाट, पार्वती सिरसाट, नंदा सिरसाट, कावेरी पाटील, शाहेरीनबी शेख, शारदा करडेल, गीता सास्ते, अमीनाबी शेख, यमुनाबाई पाटील, अनिता भोसले, माया राजपूत, सखुबाई म्हस्के यांच्यासह अनेक महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.












