लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलडाणा जिल्ह्यात काल सुरु असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी अचानक रौद्र रूप धारण केले. विशेषतः लोणार तालुक्यातील काही भागांत ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली.
खळेगाव, महार, चिकना, देऊळगाव कोळ आणि अंजनी खुर्द या गावांच्या शिवारात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला.या ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले असून अनेक ठिकाणी मातीची धूप झाली आहे. कापूस, सोयाबीन, मका, तूर अशा प्रमुख खरीप पिकांना मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. काही भागांत तर पाणी अजूनही शेतात साचले असून पुनर्लावणीसुद्धा शक्य नाही, अशी हतबल प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या जलप्रलयानंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची अवस्था पाहून प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. अनेक ठिकाणी पिकांचे व शेतातील बांधांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांपुढे आता आर्थिक संकट उभं राहिलं आहे.
स्थानिक प्रशासनाने पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवत तातडीने मदतकार्य सुरु करावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थ होत आहे.