बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यात जोरदार पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. बुलडाणा तालुक्यातही पेरणीला सुरुवात झाली आहे. यात शेतकरी नेता रविकांत तुपकर यांनी स्वतः शेतात उतरून सोयाबीनची पेरणी केली आहे. त्यांनी तिफन (ट्रॅक्टरवर लावलेली पेरणी यंत्र) स्वतः चालवली, तर त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर, वहिनी सौ. राधा तुपकर, आई-वडील आणि इतर कुटुंबीयांनीही कंबर कसून काम केले.
सकाळी पेरणीपूर्वी वडील चंद्रदास तुपकर आणि आई गीताबाई तुपकर यांनी पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करून नारळ फोडून शुभारंभ केला. त्यानंतर दिवसभर संपूर्ण तुपकर कुटुंब शेतात राबत होतं. रविकांत तुपकर स्वतः ट्रॅक्टर चालवत होते, तर त्यांच्या पत्नी व वहिनी ओट्या बांधून चाड्यावर बी-बियाणं व खत टाकत होत्या.
तुपकर हे केवळ आंदोलन करणारे नेते नाहीत, तर प्रत्यक्ष शेतात राबणारे, मातीशी नाळ जपणारे खरे शेतकरी आहेत. जनावरांना चारा-पाणी देणे, दूध काढणे, शेताची वखरण-डवरण, सगळ्या कामांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे आज त्यांनी केवळ फोटोसाठी तिफन हाती घेतलेली नव्हती, तर खऱ्या अर्थाने दिवसभर राबून पेरणी केली.
सावळा येथील त्यांच्या शेतात आज मूग, उडीद आणि सोयाबीन पेरण्यात आले. “सर्जा राजा”च्या पाठीवर थाप देत तुपकर काळ्या मातीत राबत होते, तेव्हा त्या दृश्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
राज्यात अनेक नेते शेतकऱ्यांबद्दल बोलतात, पण थेट मातीमध्ये उतरून पेरणी करणारे नेते विरळच. रविकांत तुपकरांचा हा सच्चा शेतकरी भाव आज पुन्हा एकदा उजळून निघाला!
1 thought on “शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी स्वतःच्या शेतात केली सोयाबीनची पेरणी! स्वतः हाती घेतली तिफन, काळ्या मातीत दिवसभर राबले तुपकर कुटुंब..”