चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या संकटात आता अज्ञात व्यक्तीने आणखी भर घातली आहे. चिखली तालुक्यातील धोडप येथील शेतकरी अशोक पुंडलिक शेळके यांच्या चार एकर शेतातील काढून ठेवलेली सोयाबीनची सुडी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास पेटवून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले असून, शेतकऱ्याचे अंदाजे सव्वा दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २५ नोव्हेंबरच्या पहाटे हा प्रकार उघडकीस आला.
अशोक शेळके यांनी आपल्या चार एकर शेतातील सोयाबीनची सोंगणी करून त्याची सुडी रचून ठेवली होती. काही तांत्रिक व अन्य कारणांमुळे सोयाबीनची मळणी लांबणीवर पडली होती. त्यामुळे काढणी केलेले सोयाबीन शेतातच सुरक्षित ठेवण्यात आले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या सुडीला आग लावली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण सुडी जळून खाक झाली आणि शेळके कुटुंबाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
यंदा अल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे उत्पादन आधीच घटले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत उरलेसुरले पीकही आगीत भस्मसात झाल्याने शेळके कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. मेहनतीने पिकविलेल्या सोयाबीनची राख झाल्याने शेतकरी कुटुंब हवालदिल झाले असून, परिसरातील शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शेतातील सोयाबीनच्या सुड्या पेटविणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकरी अशोक शेळके यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. या प्रकरणी अशोक शेळके यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून, पोलिसांच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.













