Advertisement Advertisement

गावाची तहान भागवायला धरणात उतरले, पण सरपंचपुत्रच पाण्यात बुडाले! मासरूळमध्ये खळबळ; दुपारपासून शोधमोहीम, अद्याप थांगपत्ता नाही!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील मासरूळ येथील धरणात गावाच्या पाणीपुरवठ्याची पाइपलाइन जोडण्यासाठी गेलेले सरपंचपुत्र मधुकर गणपत महाले हे पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना आज, १९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने मासरूळ गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या शोध व बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मासरूळ गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाइपलाइन जोडण्याचे काम सुरू होते. यासाठी मधुकर गणपत महाले यांच्यासह तिघेजण धरणाच्या पाण्यात उतरले होते. तिघेही पोहत पोहत पाइपलाइनजवळ जाण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक मधुकर महाले पाण्यात बुडाले. सोबत असलेल्या व्यक्तींना ही बाब लक्षात येताच प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे शोध व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुपारपासून धरणाच्या पाण्यात त्यांचा शोध घेतला जात आहे. तहसीलदारांसह महसूल विभागातील अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असून, संपूर्ण शोधमोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.

मात्र, बराच वेळ उलटूनही मधुकर महाले यांचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांसह मासरूळ ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. गावाच्या पाणीपुरवठ्याचे काम सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण गावावर चिंतेचे सावट पसरले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!