चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोयाबीनच्या बाजारभावात सुरू झालेली तेजी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली आहे. सोमवारी ७ हजार ७०० रुपयांवर असलेला सोयाबीनचा भाव मंगळवारी थेट ८ हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला. नव्या हंगामातील सोयाबीनला मिळालेल्या या विक्रमी भावामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी चिखली बाजार समितीच्या मार्केट यार्डात जय गजानन ट्रेडर्सचे संचालक गजानन ज्ञानदेव शेळके यांच्या अडत दुकानावर शिरपूर येथील शेतकरी गजानन विश्वनाथ शेळके यांनी नवीन हंगामातील सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. जाहीर लिलावात त्यांच्या सोयाबीनला तब्बल ८ हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. सलग दुसऱ्या दिवशीही बाजारभावातील तेजी कायम राहिल्याने या विक्रमी दराची विशेष चर्चा होत आहे.
या उच्चांकी भावाची दखल घेत बाजार समिती प्रशासनाच्या वतीने शेतकरी गजानन विश्वनाथ शेळके यांचा सत्कार करण्यात आला. सध्या चिखली बाजार समितीच्या जाहीर लिलावात सोयाबीनला साधारणतः ६ हजार ५०० रुपयांच्या पुढे दर मिळत असल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बाजार समितीच्या जाहीर लिलाव प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या मालाला पारदर्शक पद्धतीने चांगला आणि उच्चतम दर मिळत असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन व इतर शेतमाल विक्रीसाठी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात आणावा, असे आवाहन सभापती समाधान सुपेकर, उपसभापती श्रीकिसन धोंडगे आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.















