Advertisement Advertisement

तितरांची शिकार करून बुलढाण्याकडं निघाले, पण धाड नाक्यावरच वन विभागानं धरलं! दोन शिकारी जेरबंद, पाच तितरांसह दुचाकी अन् पिंजरे जप्त!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मुक्या वन्यजीवांचा जीव घेणाऱ्या शिकाऱ्यांविरुद्ध बुलढाणा वन विभागाने जोरदार कारवाई केली आहे. देऊळघाट परिसरातून तितर पक्ष्यांची अवैध शिकार करून दुचाकीने बुलढाण्याकडे निघालेल्या दोन शिकाऱ्यांना वन विभागाच्या पथकाने धाड नाक्याजवळ नाकाबंदी करून पकडले. सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध वन्यजीव शिकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बुलढाणा वनपरिक्षेत्रात वन्यजीवांची शिकार होत असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीएफओ जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, एसीएफ विजय कटके आणि आरएफओ सुनील वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने धाड नाक्याजवळ सापळा रचला. यावेळी बुलढाण्याच्या दिशेने येणाऱ्या संशयित दुचाकीला अडवून तपासणी केली असता, दोन पिंजऱ्यांमध्ये पाच तितर पक्षी कोंबून नेले जात असल्याचे उघड झाले.

वन विभागाच्या पथकाने तत्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच तितर पक्षी, दोन पिंजरे आणि शिकार करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सै. नासिर सै. अली (वय ५८) आणि सलीम खान इस्माईल खान (वय ४०), दोघेही रा. टिपू सुलतान चौक, बुलढाणा यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक नितेश गवई, समाधान शिंदे, समाधान झोटे तसेच वनमजूर अमोल चौहान आणि दीपक सोनुने यांनी पार पाडली. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे वन्यजीवांची अवैध शिकार करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे. मुक्या पक्ष्यांचा जीव घेणाऱ्यांवर वन विभागाने अशीच कठोर नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!