Advertisement Advertisement

महिलांचा दारूविक्रीविरोधात एल्गार!अवैध दारू विक्रेत्याला महिलांनी शिकवला धडा; दुकानासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन, उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईची ग्वाही…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावातील तरुणाई दारूच्या आहारी जात असून, दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. घराघरांत भांडणे, कौटुंबिक कलह आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याने अखेर पार्डा गावातील महिलांचा संयम सुटला. अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी थेट रणशिंग फुंकत विक्रेत्याच्या दुकानावर धडक दिली. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता महिलांनी दारू विक्रेत्याला पकडून मारहाण केली. त्यानंतर कारवाईच्या मागणीसाठी दिवसभर दुकानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. महिलांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी दारू विक्रेत्याला ताब्यात घेतले. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन यापुढे दारू विक्री होणार नाही, अशी ग्वाही दिली. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहकर तालुक्यातील सुमारे दोन हजार लोकसंख्येच्या पार्डा गावात विजय भानुदास गाडे याने अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय वाढविण्यासाठी त्याने हॉटेलही सुरू केले. गावात सहज दारू उपलब्ध होऊ लागल्याने दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली. विशेष म्हणजे तरुण मुलेही व्यसनाच्या आहारी जाऊ लागली. दारूमुळे अनेक घरांमध्ये वादविवाद सुरू झाले. कौटुंबिक वातावरण बिघडण्यासोबतच गावातील सामाजिक शांतताही धोक्यात आली. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले. व्यसनामुळे तरुणांच्या लग्नाचाही प्रश्न निर्माण होऊ लागल्याने महिलांमध्ये तीव्र संताप होता.

गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी महिलांनी यापूर्वी मेहकर पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. संबंधित विक्रेत्यालाही दारू विक्री बंद करण्याची समज दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून दारू विक्री सुरूच ठेवण्यात आली. अखेर विस्कटत चाललेले संसार वाचविण्यासाठी महिलांनी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजताच दारू विक्रीच्या दुकानावर धडक दिली. यावेळी विजय गाडे दारू विक्री करताना आढळल्याने महिलांनी त्याला पकडून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी गावात धाव घेतली.

दारूबंदी आणि संबंधित विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलांनी दुकानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. गावात संपूर्ण दारूबंदी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा महिलांनी घेतला. महिलांचा आक्रमक विरोध पाहता पोलिसांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देऊळगाव राजा येथील निरीक्षक सोळंके यांनी गावात भेट दिली. यापुढे पार्डा गावात अवैध दारू विक्री होणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. निरीक्षक सोळंके यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रिकाम्या बाटल्याही अधिकाऱ्यांच्या हवाली!

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गावात पोहोचल्यानंतर महिलांनी दारू विक्रीच्या दुकानातून गोळा केलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या. महिलांनी एकजुटीने उभारलेल्या या आंदोलनामुळे पार्डा गावातील अवैध दारूविक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता प्रशासन दिलेल्या शब्दाला जागून गावात कायमस्वरूपी दारूबंदी करणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!