बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतात एकट्या असलेल्या शेतकऱ्याला गाठून जबरदस्तीने वाहनात बसवायचे, अज्ञात ठिकाणी घेऊन जात तब्बल आठ तास डांबून ठेवायचे आणि या काळात मारहाण करायची, असा धक्कादायक प्रकार मेहकर तालुक्यातील विश्वी शिवारात उघडकीस आला आहे. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनिल नामदेवराव शेवाळे (वय ५०, रा. विश्वी) यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी दिलीप देशमुख याच्यासह तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल शेवाळे हे ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात एकटेच होते. याचवेळी दिलीप देशमुख (रा. विश्वी) याच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्ती शेतात आल्या. चौघांनी संगनमत करून शेवाळे यांना जबरदस्तीने वाहनात बसवले आणि अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. तेथे तब्बल आठ तास त्यांना डांबून ठेवत मारहाण केल्याचा आरोप शेवाळे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.
दुपारी ३ वाजता उचललं, रात्री ११ वाजता आणून सोडलं!
शेतकऱ्याला दुपारी ३ वाजता वाहनात बसवून नेल्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत त्यांना डांबून ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपींनी त्यांना पुन्हा मूळ ठिकाणी आणून सोडल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामागे नेमके कारण काय, शेतीचा वाद आहे की जुने वैमनस्य, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. मात्र, भरदिवसा शेतातून शेतकऱ्याला जबरदस्तीने घेऊन जाण्याच्या या प्रकारामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिलीप देशमुखसह चौघांवर गुन्हा; गणेश इंगोले तपास करणार!
घटनेनंतर अनिल शेवाळे यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ३ नोव्हेंबर रोजी दिलीप देशमुख आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले करीत आहेत. आरोपींची ओळख पटविणे, वापरलेल्या वाहनाचा शोध घेणे आणि शेतकऱ्याला जबरदस्तीने नेण्यामागील नेमके कारण शोधणे, या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.












