बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : नांदुरा तालुक्यातील तांदुळवाडी गावातून २६ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही तरुणीचा ठावठिकाणा लागला नसल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी येथील चंदाबाई गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, ३० ऑक्टोबर रोजी फिर्यादी आणि त्यांचे पती शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी दोघेही घरी परतल्यानंतर त्यांची २६ वर्षीय मुलगी दिपाली घरी दिसून आली नाही.
त्यानंतर कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, अनेक ठिकाणी शोध घेऊनही दिपालीचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत आईने पोलिसांत धाव घेतली.
या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुपडसिंग चव्हाण करीत आहेत. बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.












