Advertisement Advertisement

साखरखेर्डा परिसरात बिबट्याची दहशत! कापूस वेचणी करणाऱ्या महिलांसमोरच बिबट्याने ठोकला ठिय्या; आरडाओरड करताच शेतकऱ्यांची धावपळ!

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : साखरखेर्डा परिसरातील पिंपळगाव सोनारा आणि तांदुळवाडी शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी लांडक तळे शिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलांना चक्क कपाशीच्या शेतात बिबट्या बसलेला दिसला. अचानक समोर बिबट्या दिसताच महिलांची एकच तारांबळ उडाली. महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा काकडे हे पत्नी व इतर महिलांसोबत लांडक तळे शिवारातील शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. महिला कपाशीच्या बोंडातून कापूस वेचत असतानाच शेतात बिबट्या बसलेला आढळला. हा प्रकार पाहून महिलांनी आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी जमा झाले. सर्वांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तांदुळवाडी शिवाराच्या दिशेने धूम ठोकल्याचे कृष्णा काकडे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरापासून या भागात बिबट्याचा वावर असल्याचे शेतकरी सांगत आहेत. महिनाभरापूर्वी मारोती साखरे यांच्या शेतातही बिबट्या दिसला होता. त्यावेळी त्याने रोही (नीलगाय) या वन्यप्राण्याची शिकार केली होती. मोहाडी, शिंदी, राताळी आणि सवडद परिसरातही बिबट्या फिरताना दिसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सध्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. महिला मजूर मोठ्या संख्येने शेतात जात असून, कपाशीच्या दाट पिकात बिबट्या दबा धरून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतात जाताना शेतकरी आणि शेतमजुरांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. या भागातील बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे रोही आणि हरणांसारखे वन्यप्राणीही परिसरातून दूर गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन ठाणेदार युवराज रबडे यांनी केले आहे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!