डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): हॉटेलला कोणतीही पूर्वसूचना न देता सील लावण्याचा प्रयत्न केल्याचा जाब विचारल्यावर ग्रामसेवकाने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची आणि हॉटेल जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ग्रामसेवकाविरुद्ध २८ ऑक्टोबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी निशा ओंकार चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या कुटुंबाचे नवनाथ हॉटेल गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून सुरू असून, हॉटेलच्या जागेबाबत ग्रामपंचायतीसोबत वाद सुरू आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, हॉटेल त्यांच्या ताब्यात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
२८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्या नवनाथ हॉटेलवर गेल्या असता ग्रामसेवक विजय केशवराव दांडगे हे हॉटेलला सील लावत असल्याचे दिसून आले. सील लावण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना का दिली नाही, असा जाब विचारताच ग्रामसेवकाने उद्धटपणे “कोर्टात जा” असे सांगत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.यावेळी हॉटेलमधील सामान अस्ताव्यस्त करून “जीवे मारून टाकीन” तसेच “हॉटेल जाळून टाकीन” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी ग्रामसेवक विजय दांडगे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.













