Advertisement Advertisement

दारूच्या नशेत डोकं फिरलं अन् थेट कुऱ्हाड उपसली! रस्त्यानं जाणाऱ्या २० वर्षांच्या तरुणावर ५० वर्षांच्या इसमाचा जीवघेणा हल्ला….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील निमखेड येथे दारूच्या नशेत एका ५० वर्षीय व्यक्तीने रस्त्याने जाणाऱ्या २० वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना २६ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निमखेड येथील रितेश विजय फाळके (वय २०) हा २६ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता गजानन रघुनाथ क्षिरसागर यांच्या घरासमोरील रस्त्याने एकटाच जात होता. त्यावेळी गावातील मुकुंद रामकृष्ण क्षिरसागर हा दारूच्या नशेत तेथे आला.

यावेळी कोणतेही स्पष्ट कारण नसताना मुकुंद क्षिरसागर याने रितेश फाळके याच्यावर कुऱ्हाडीने वार केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात रितेश गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात मुकुंद रामकृष्ण क्षिरसागर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार विजय सुरळकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!