बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): मागील जवळपास ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभी पिके करपण्याची वेळ आली असून, सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून तातडीने मदत करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्य प्रवक्त्या अड. जयश्री शेळके यांनी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकरी अडचणीत असताना सत्ताधाऱ्यांकडून केवळ आढावा बैठका आणि दौरे सुरू असल्याची टीका शेळके यांनी केली. प्रत्यक्ष मदतीची गरज असताना सरकारकडून पंचनाम्यांचे आदेश देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील मागण्यांचा उल्लेख अलीकडील वृत्तांतही करण्यात आला आहे.
सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत आणि अॅड. जयश्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली पंचनाम्यांच्या शासन निर्णयाच्या प्रतीचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने आणखी दुर्लक्ष केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या आंदोलनावेळी उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, जिल्हा संघटक सुमित सरदार, तालुकाप्रमुख विजय इतवारे, शहर संपर्कप्रमुख सुनील भाग्यवंत, शहरप्रमुख विजय राऊत, उपशहरप्रमुख गजानन गवई, युवासेना शहरप्रमुख मनोज चंदन, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख प्रियंका पिंपळे, उपतालुकाप्रमुख भावना पाटील यांच्यासह सुनंदा खरात, सुधाकर मुंढे, नीलेश तायडे, निलेश हरकल, दिलीप राजभोग, शेख रफीक, श्रीकांत जाधव, नीलेश पाटील, सागर तायडे, विनोद तायडे, सतीश राजपूत, केशव भोलाने, गजानन सुरडकर, अनिता गायकवाड, अर्चना शेळके, स्मिता वराडे, शितल सुरडकर आणि सोनाली वाघ यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.














