Advertisement Advertisement

शेतकऱ्याच्या घरात पुन्हा दुःखाचा डोंगर! कर्ज अन् पिकांच्या चिंतेत युवा लेकराचा मृत्यू; रताळी सुन्न…

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथून जवळच असलेल्या रताळी येथील २६ वर्षीय युवा शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. आकाश बळीराम पाटील असे मृत युवकाचे नाव आहे. आर्थिक विवंचना आणि कुटुंबावरील वाढता कर्जाचा बोजा यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश यांचे वडील बळीराम पाटील यांच्याकडे रताळी येथे चार एकर शेती आहे. सन २०१९-२० मध्ये त्यांनी भारतीय स्टेट बँकेकडून कृषी कर्ज घेतले होते. मात्र, चार एकर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाची नियमित परतफेड करणे शक्य झाले नाही. त्यातच कुटुंबात दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी असल्याने वाढत्या कौटुंबिक खर्चाचा ताणही होता. कर्जावरील व्याज वाढत गेल्याने आर्थिक अडचणी अधिकच गंभीर झाल्या.

यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठा खंड दिल्याने शेतातील पिकांवर परिणाम झाला. बहरलेली पिके हातची गेल्याने उत्पन्नाची अपेक्षा कमी झाली. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबासमोरील संकट आणखी वाढले. वडिलांवरील वाढता कर्जाचा बोजा आणि आर्थिक विवंचनेच्या पार्श्वभूमीवर आकाश यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत आकाश यांचे चुलत भाऊ सागर परशुराम पाटील यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे पाठविला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्ती पोफळे पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!