चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखलीचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल बोंद्रे यांनी अखेर आपल्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देत स्वतःच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राहुल बोंद्रे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ प्रसिद्ध करून आपण भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. “मी आतापर्यंत काँग्रेससाठी सर्वस्व अर्पण केले. माझ्या हयातीत अनेक वर्षे काँग्रेससाठी काम केले. आता मी वेगळा राजकीय निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी या व्हिडिओत सांगितले.
काँग्रेसने खूप काही दिलं; मुकुल वासनिक, हर्षवर्धन सपकाळांचा आवर्जून उल्लेख…
भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर करताना राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमधील आपल्या जुन्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “काँग्रेसने मला खूप काही दिलं. मुकुल वासनिक यांनी प्रेम दिलं, हर्षवर्धन सपकाळ यांनी लहान भावासारखं प्रेम दिलं. किती नावं घेऊ?” असे म्हणत त्यांनी काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांचा उल्लेख केला. राजकीय वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी जुने मित्र आणि सहकाऱ्यांशी असलेली नाती कायम राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “जुने सहकारी, जुने मित्र यांना आयुष्यभर विसरू शकणार नाही. राजकीय वाट वेगळी निवडली असली तरी प्रेम आणि नातं कायम राहील,” असे बोंद्रे म्हणाले.
प्रवेशाची तारीख अद्याप गुलदस्त्यात….
गेल्या काही दिवसांपासून राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा चिखलीसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, त्यांच्या प्रवेशाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नव्हती. आता स्वतः बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय स्पष्ट केल्याने या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, भाजप प्रवेशाची नेमकी तारीख आणि ठिकाण त्यांनी आपल्या व्हिडिओत जाहीर केलेले नाही. दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी मुंबईत त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, अधिकृत घोषणेकडे लक्ष लागले आहे.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा दाखला….
आपल्या राजकीय निर्णयाचे स्पष्टीकरण देताना राहुल बोंद्रे यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा दाखला दिला. शिकागो येथील जागतिक धार्मिक परिषदेत स्वामी विवेकानंदांनी मांडलेल्या विचारांचा संदर्भ देत “वेगवेगळे रस्ते शेवटी एका ठिकाणी मिळतात. सर्व धर्म सत्य आहेत, हा स्वामी विवेकानंदांचा विचार होता. स्वामी विवेकानंदांचे विचार माझ्यासाठी आदर्श आहेत,” असे त्यांनी सांगितले.
चिखलीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा….
राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय स्वतः जाहीर केल्याने चिखलीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः विद्यमान भाजप आमदार श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे यांच्यातील प्रदीर्घ राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षांतर्गत राजकारणाची दिशा काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बोंद्रे यांच्या या निर्णयामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत याबाबत आणखी चित्र स्पष्ट होणार आहे.















