डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पती, सासू आणि जाऊ घरात नसल्याची संधी साधून नवविवाहितेने सासरच्या घरातून अचानक पलायन केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेत माहेर गाठले. मात्र, आपण येत असल्याचा सुगावा लागताच नववधूने आपल्या मावशीसह तेथूनही पोबारा केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या नववधूचे यापूर्वीही लग्न झाले असल्याचे आणि पहिल्या पतीपासून अद्याप कायदेशीर सोडचिठ्ठी झालेली नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील तरुणाचे लग्न ३ सप्टेंबर रोजी झाले होते. लग्न जुळत नसल्याने कुटुंबीय चिंतेत असतानाच अचानक लग्न ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. नवरदेवानेही भावी आयुष्याची स्वप्ने रंगवण्यास सुरुवात केली होती. मात्र, लग्नाला अवघे काही दिवस होत नाही तोच नववधूने घरातून गायब होऊन या आनंदाला धक्का दिला.
नवरदेव व त्याचा भाऊ कामानिमित्त घराबाहेर गेले होते, तर सासू मंदिरात आणि जाऊ कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. घरात कोणी नसल्याची संधी साधून नववधूने घरातून पलायन केले. सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर नववधू घरात नसल्याचे लक्षात आले. तिचा आजूबाजूला तसेच नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी सकाळी नवरदेवाच्या कुटुंबीयांनी डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नववधूच्या माहेरी धाव घेतली. मात्र, ते तिच्या घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांना सुगावा लागल्याचे सांगण्यात येत असून, नववधू आपल्या मावशीसह तेथूनही निघून गेली. यानंतर नवरदेवाच्या कुटुंबीयांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून सरपंच व पोलीस पाटलांना प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तातडीने डोणगाव पोलिसांना कळविले. पोलिसांनी संबंधित गावात जाऊन नवरदेवाच्या कुटुंबीयांना सोबत घेत डोणगाव पोलीस स्टेशन गाठले.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. या लग्नासाठी अकोला येथील एका महिलेने नवरदेवाकडून ६० हजार रुपये घेत ग्रामपंचायत कार्यालयात लग्न लावून दिल्याची माहितीही समोर आली आहे. लग्नाला अवघे बारा दिवस झाले असतानाच नववधूने घर सोडल्याने या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणामागील नेमके कारण काय, तसेच नववधूच्या पूर्वीच्या विवाहाबाबतची माहिती काय आहे, याबाबत पोलिसांच्या चौकशीनंतर अधिक स्पष्टता होण्याची शक्यता आहे.













