देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे गेल्या दोन वर्षांपासून विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच वारकरी संप्रदायाशी संबंधित उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा मंडळाचे तिसरे वर्ष असून, यावर्षीदेखील मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या माध्यमातून केवळ गणेशोत्सव साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. गावातील नागरिक, विद्यार्थी तसेच गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम मंडळाकडून केले जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जोड मिळाली आहे.
दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देऊळगाव घुबे येथे भेट देऊन विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली. मंडळाच्या सामाजिक कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
“विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वारकरी संप्रदायाचे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. जिल्ह्यातील इतर गणेश मंडळांनीही या मंडळाचा आदर्श घेऊन गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत,” असे मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.
गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची ताकद मिळावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपला संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले सामाजिक कार्य आणि यंदाच्या तिसऱ्या वर्षातील विविध उपक्रम पाहता, मंडळाचे कार्य निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता समाजहिताचे कार्य करण्याचे माध्यम बनावे, याचा आदर्श देऊळगाव घुबे येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाने निर्माण केला असून, या कार्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.















