देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील उंबरखेड येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेले असताना सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी जवळखेड शिवारात घडली. या घटनेमुळे उंबरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मधुकर कडुबा कायंदे (वय ४५, रा. उंबरखेड) हे जवळखेड शिवारातील शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास शेतालगत असलेल्या शरद शेषराव कायंदे यांनी मधुकर यांना साप चावल्याची माहिती त्यांच्या भावाला फोनद्वारे दिली.
माहिती मिळताच रामेश्वर कडुबा कायंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मधुकर कायंदे हे शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले. रामेश्वर कायंदे व शरद कायंदे यांनी त्यांना मोटारसायकलवरून तातडीने देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मधुकर कायंदे यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी रामेश्वर कडुबा कायंदे यांच्या तोंडी माहितीवरून देऊळगावराजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग) क्रमांक ३७/२०२६ दाखल करण्यात आली आहे. दाखल अधिकारी म्हणून एएसआय निलीमा जाधव यांनी कार्यवाही केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहेत.















