देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातून १६ वर्षे ८ महिन्यांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणी देऊळगाव राजा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी पंजाब राज्यातून देऊळगाव राजा येथे आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती. ९ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास ती घराबाहेर गेली. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.
फिर्यादी लखन वर्मा यांनी देऊळगाव राजा शहरातील नातेवाईक तसेच इतर परिचितांकडे फोन करून मुलीबाबत माहिती घेतली. विविध ठिकाणी शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर अज्ञात इसमाने फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीवरून देऊळगाव राजा शहर पोलिसांनी कलम १३७(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने पीएसआय नितीन मिंड यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पोलिसांकडून बेपत्ता मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.












