सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (MSF) जवानांनी सतर्कता दाखवत धडक कारवाई केली. चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र जवानांनी पाठलाग करून अलीम पठाण नावाच्या एका संशयिताला धारदार चाकूसह ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नागपूर कॉरिडॉर परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक दीपक पाटील व सिद्धांत वाकोडे हे RPV (रोड पेट्रोलिंग व्हेईकल) सोबत समृद्धी महामार्गावर गस्त घालत होते. रात्री सुमारे १.२५ वाजता त्यांना ट्रकचालकाचा फोन आला. काही अज्ञात व्यक्ती महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करत असल्याची माहिती मिळताच MSF पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
जवान घटनास्थळी पोहोचताच डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, MSF जवानांनी पाठलाग करून एका चोरट्याला पकडले. चौकशीत त्याने आपले नाव अलीम पठाण असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ धारदार चाकू आढळून आला. जवानांनी विलंब न करता ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.
यानंतर रात्री सुमारे १.४० वाजता देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल गणेश मोहिते व राहुल मुळे घटनास्थळी दाखल झाले. MSF जवानांनी संशयित आरोपीला धारदार शस्त्रासह पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
दरम्यान, या घटनेत ट्रक चालक नेवालाल साकेत यांच्या MH 40 AK 9765 क्रमांकाच्या ट्रकमधून डिझेल चोरी झाल्याचे समोर आले. तसेच घटनास्थळी उभ्या असलेल्या MH 40 BG 3765 क्रमांकाच्या ट्रकमधूनही डिझेल लांबवण्यात आल्याचे चालक ब्रिजेश दिग्वदी यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित चालकांना तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, डिझेल चोरीच्या या प्रकारामागे आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.












