किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तढेगाव शिवारात सोयाबीनच्या शेतात आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या पाच तासांत हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि किनगाव राजा पोलिसांना यश आले. जुन्या वादातून दीड लाख रुपयांची सुपारी देऊन विषारी दारू पाजून उमेश रमेश परिहार (वय ३८, रा. साकेगाव, ता. चिखली) याचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात सुपारी देणाऱ्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
साकेगाव येथील रमेश सांडूसिंग परिहार (वय ६५) यांनी ११ सप्टेंबर रोजी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांचा मुलगा उमेश हा ९ सप्टेंबर रोजी मडाखंड येथे मुलाला भेटण्यासाठी गेला होता. मात्र, दोन दिवसांनी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी तढेगाव शिवारातील रस्त्यालगत घनश्याम कुटे यांच्या सोयाबीनच्या शेतात उमेश मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या तोंडातून व नाकातून रक्त आलेले होते, तर डोक्याला मार लागल्याचेही दिसून आले.
मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. मृताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, तांत्रिक तपास आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या पाच तासांत मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर उमेशच्या पूर्वीच्या वादांची माहिती घेत संशयितांचा माग काढण्यात आला.
पोलिस तपासात उमेश परिहार आणि गणेश मोतीसिंग राजपूत यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचे समोर आले. याच जुन्या वादातून उमेशचा काटा काढण्याचा कट रचण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. गणेश राजपूत याने सागर पवार याच्यामार्फत नसीम खाँ पठाण आणि गणेश काळे यांना उमेशच्या हत्येसाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
९ सप्टेंबर रोजी गणेश राजपूत आणि गणेश काळे यांनी उमेशला सोबत घेतले. त्यानंतर साखरेखर्डा येथून सागर पवार आणि नसीम खाँ पठाण यांनाही सोबत घेण्यात आले. चौघे उमेशला घेऊन लोणार येथे गेले. तेथे सर्वांनी दारू व जेवण केले. याचवेळी गणेश काळे याने उमेशच्या दारूच्या बाटलीत विषारी पदार्थ मिसळून ती दारू त्याला पाजल्याचे तपासात समोर आले आहे.
विषारी दारू प्यायल्यानंतर उमेशचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह तढेगाव शिवारातील सोयाबीनच्या शेतात टाकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा केला.
या प्रकरणात गणेश मोतीसिंग राजपूत (३९, रा. उतरादा, ता. चिखली), गणेश पुंजाजी काळे (४२, रा. सारस्वती, ता. लोणार), नसीम खाँ उमर खाँ पठाण (५०, रा. ईसोली, ता. चिखली) आणि सागर प्रकाश पवार (५०, रा. उतरादा, ता. चिखली) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, सपोनि संजय मातोंडकर, पोउपनि प्रताप बाजड, सफौ राजेंद्र अंभोरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि तांत्रिक विश्लेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सपोनि संजय मातोंडकर करीत आहेत.













