चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षीय आयांश प्रमोद सुरडकर याच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून दोन ठिकाणी गंभीर चावा घेतल्याची घटना संभाजीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नगरपालिकेने कंत्राट दिलेले असतानाही कुत्र्यांचे हल्ले सुरूच असल्याने पालिकेच्या उपाययोजनांवर नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हल्ल्यावेळी आयांशसोबत खेळत असलेल्या मुलांनी आरडाओरड केल्यानंतर विमलबाई येवतकर, तुळसाबाई अवसरमोल, गोपाळ येवतकर, समाधान अवसरमोल, कुसाबाई हिवाळे आणि आयांशची आजी विमल सुरडकर यांनी घटनास्थळी धाव घेत कुत्र्याला हाकलून लावले. त्यानंतर जखमी आयांशला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला रेबीज प्रतिबंधक प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र, जखमा खोल असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला बुलढाणा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बकरी, वृद्धानंतर आता बालकावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण…..
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी याच परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने बकरीवर हल्ला केला होता. तसेच एका वृद्ध व्यक्तीच्या पायाचाही कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर आता पाच वर्षीय बालकावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बकरी आणि वृद्धावरील हल्ल्यानंतर बालकावरील हल्ला ही तिसरी घटना असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील आक्रमक कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कंत्राट दिलंय, मग कुत्र्यांचे हल्ले थांबत का नाहीत?
चिखली नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी तसेच नसबंदी आणि लसीकरणासाठी भोकरदन येथील **’वेदिका अॅनिमल वेलफेअर एजन्सी’**ला कंत्राट दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, कंत्राटाची अंमलबजावणी सुरू असतानाही भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांचे हल्ले नियंत्रणात येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आतापर्यंत किती कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले, त्याची प्रत्यक्ष पडताळणी कशी झाली आणि कंत्राटदाराच्या कामावर पालिकेचे नियंत्रण कितपत आहे, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आक्रमक कुत्र्यांना पकडा, कंत्राटाची चौकशी करा……
बालकावरील हल्ल्याची घटना गांभीर्याने घेत पालिका प्रशासनाने परिसरात तातडीने मोहीम राबवून आक्रमक व भटक्या कुत्र्यांना सुरक्षितरीत्या पकडावे, अशी मागणी होत आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराने केलेल्या नसबंदी व लसीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष तपासणी करून कंत्राटाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली आहे की नाही, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लहान मुलांवर हल्ले होण्यापूर्वीच पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.














