खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संतोष विश्वनाथ बघे (रा. खामगाव) याच्याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी मुलीच्या शाळेला सुटी असल्याने ती घरी एकटीच होती. सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान आरोपी तिच्या घरी गेला. त्याने मुलीच्या आई-वडिलांबाबत विचारणा केली. त्यावेळी आई-वडील सोयाबीन काढण्यासाठी शेतात गेल्याचे मुलीने सांगितले.
त्यानंतर आरोपीने खिशातून पैसे काढून मुलीला देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने पैसे घेण्यास नकार दिला. तरीही आरोपीने तिला पैसे घेण्यासाठी जबरदस्ती केली आणि जबरदस्तीने जवळ ओढले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी संतोष विश्वनाथ बघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.














