खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील शंकरनगर परिसरात हातात कोयता घेऊन वाद घालणाऱ्या एका व्यक्तीने दोघांवर हल्ला केल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव राजू उमाळे (वय २४, रा. शंकरनगर, बुद्धविहारजवळ, खामगाव) हे घरी जात असताना त्यांना परिसरात लोकांची गर्दी दिसली. यावेळी सुदेश ऊर्फ नाना रमेश दामोदर (रा. शंकरनगर, विहार गल्ली, खामगाव) हा हातात कोयता घेऊन वाद घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थिती चिघळू नये म्हणून उमाळे यांनी त्याला समजावून सांगत घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने ‘आज मी सगळ्यांना मारून टाकीन,’ अशी धमकी देत उमाळे यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उमाळे यांनी तेथून पळ काढला. यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळही केली.
दरम्यान, विजय बाबुराव शेजवळ हे त्यांच्या घरासमोर बसलेले होते. गौरव उमाळे यांना शिवीगाळ होत असल्याचे पाहून त्यांनी आरोपीला हटकले आणि शिवीगाळ करू नको, असे सांगितले. मात्र, याचा राग आल्याने आरोपीने शेजवळ यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी गौरव उमाळे यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), ३५२ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.













