खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातून मुरूम आणि गिट्टीने भरलेले टिप्पर नेण्यास विरोध करणे एका सेवानिवृत्त शिक्षकाला चांगलेच महागात पडले. याच कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांनी सेवानिवृत्त शिक्षकासह त्यांच्या पुतण्याला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी पारखेड शिवारात घडली. या हल्ल्यात शिक्षक जखमी झाले असून, त्यांच्या पुतण्याचे नाक फॅक्चर झाले आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद शंकरराव वानखडे (वय ५४, रा. वृंदावननगर, वाडी, खामगाव) हे सेवानिवृत्त शिक्षक असून, त्यांचे पारखेड शिवारातील गट क्रमांक ३३९ मध्ये शेत आहे. त्यांच्या शेतातील रस्त्यावरून मुरूम व गिट्टीने भरलेले टिप्पर नेण्यास त्यांनी यापूर्वीच विरोध केला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून २५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास प्रमोद वानखडे आणि त्यांचा पुतण्या वृषभ वानखडे शेतात असताना पाच जण तेथे आले. त्यांनी दोघांशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लोखंडी रॉडने प्रमोद वानखडे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला, छातीवर, पायावर, मांडीवर आणि पाठीवर वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. काकांना मारहाण होत असल्याचे पाहून भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या वृषभ वानखडे यालाही आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात वृषभचे नाक फॅक्चर झाले, तर प्रमोद वानखडे हेही गंभीर जखमी झाले.
जखमी प्रमोद वानखडे यांना उपचारासाठी खामगाव येथील सिल्व्हर सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डिलक्स वॉर्ड क्रमांक २ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. या जबाबावरून मुकेश कुऱ्हाडे, रूपेश कुऱ्हाडे, भास्कर कुऱ्हाडे (तिघे रा. पारखेड) तसेच अभिनव मुहे आणि अभिलाष मुहे (दोघे रा. रायगड कॉलनी, खामगाव) या पाच जणांविरुद्ध २६ नोव्हेंबर रोजी रात्री भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.













