Advertisement Advertisement

हजार रुपये कमी करा म्हटलं अन् हॉस्पिटलमध्येच पेटला वाद! डॉक्टरांच्या केबिनमध्ये पतीला मारहाण, पत्नीचा नकाब ओढल्याचा आरोप; तिघांवर गुन्हा!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : उपचाराचे उर्वरित बिल भरताना एक हजार रुपये कमी करण्याची विनंती करणे एका रुग्णाच्या नातेवाइकांना चांगलेच महागात पडल्याचा आरोप समोर आला आहे. बिलातील रक्कम कमी करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाण आणि विनयभंगाच्या तक्रारीत झाले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी शहरातील योगीराज हॉस्पिटलचे डॉ. सुहास खेडेकर यांच्यासह तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लाखणवाडा येथील हिनाबी परविन शेख शाहरुख (वय २६) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या भावाला सय्यद मोहीम सय्यद मुबारक यांना सर्पदंश झाल्याने २५ नोव्हेंबर रोजी चिखली येथील योगीराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारापोटी यापूर्वी २४ हजार १२७ रुपये बिल भरण्यात आले होते. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर उर्वरित ११ हजार रुपयांचे बिल भरण्याची वेळ आली.

यावेळी फिर्यादीचे पती बिलासंदर्भात चर्चा करण्यासाठी डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. त्यांनी उर्वरित बिलातून एक हजार रुपये कमी करण्याची विनंती केली. मात्र, याच कारणावरून डॉ. सुहास खेडेकर आणि केबिनमध्ये उपस्थित असलेल्या अन्य दोन ते तीन जणांनी शिवीगाळ करीत फिर्यादीच्या पतीला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी फिर्यादी मध्ये पडल्या असता, त्यांचा चेहऱ्यावरील नकाब ओढून विनयभंग करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तसेच उपस्थितांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये डॉ. सुहास खेडेकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!