शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील दसरा नगर येथील तीन पुतळे परिसरातील नगर परिषदेच्या सौंदर्यीकरण तलावात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. मोहम्मद अतहर मोहम्मद शहजाद (वय २१, रा. इदगाह प्लॉट, शेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दसरा नगर परिसरातील तलावात एक युवक पडल्याची माहिती डायल ११२ वरून पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी नागरिक तसेच मृत युवकाच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात शोध घेऊन मोहम्मद अतहर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे पाठविण्यात आला.
या घटनेप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश गाडगे करीत आहेत.














