मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात मुक्कामी असलेल्या तब्बल पाच एसटी बसेसच्या समोरील काचा लोखंडी रॉडने फोडून सुमारे ८० हजार रुपयांचे शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राज्य परिवहन विभागाच्या मलकापूर आगारातील सुरक्षा रक्षक संजय सुखदेव खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १.३० वाजता ते बसस्थानकावर कर्तव्यावर होते. बस आल्याने स्थानक परिसरात झोपलेल्या प्रवाशांना उठवित असताना अचानक तोडफोडीचा आवाज ऐकू आला.
सुरक्षा रक्षकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता एक इसम हातात लोखंडी रॉड घेऊन बसस्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या एसटी बसच्या समोरील काचा फोडताना दिसून आला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. त्याचे नाव विचारले असता त्याने संजय गवई असे सांगितले. त्यानंतर हाताला झटका देऊन तो घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेत एमएच ४० वाय ५८३०, एमएच १४ बीटी ४३५६, एमएच ४० एक्यू ६१७२, एमएच ४० एक्यू ६४४२ आणि एमएच ४० वाय ५६९५ या पाच एसटी बसेसच्या समोरील काचा फोडण्यात आल्या. या तोडफोडीत अंदाजे ८० हजार रुपयांचे शासकीय बसचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अप. नं. ६०६/२०२६ नुसार कलम ३२४(४) बीएनएसएस तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमातील कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोहेका अमोल शेले करीत आहेत.















