Advertisement Advertisement

नवरदेव, नातेवाईक, बँडबाजा सगळं तयार;कोट-सूट घालून ४२ नवरदेव मंडपात आले; संध्याकाळ झाली तरी नवऱ्यांचा पत्ताच नाही..!

देवास(कव्हरेज नेटवर्क ग्रुप): लग्न लावून देण्याच्या आमिषाने तब्बल ४२ तरुणांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील देवास येथे उघडकीस आली आहे. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नटून-थटून पोहोचलेल्या ४२ नवरदेवांना अखेर नवरीच न आल्याने मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पीडित तरुणांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवास आणि आसपासच्या जिल्ह्यातील अविवाहित तरुणांना विदिशा येथील एका तरुणाने लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवले होते. इंदूरमधील एका अनाथाश्रमातील मुलींसोबत सामूहिक विवाह आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी प्रत्येक तरुणाकडून १५ ते २५ हजार रुपये उकळण्यात आले.

विश्वास संपादन करण्यासाठी संबंधित तरुणांना मोबाईलवर मुलींचे फोटोही दाखवण्यात आले. अनेक वर्षांपासून लग्न न झाल्याने हे तरुण आणि त्यांचे कुटुंबीय आनंदात होते. काहींनी तर लग्नासाठी पैसे उधारदेखील घेतले होते.

ठरल्याप्रमाणे सर्व ४२ तरुण कोट, मुंडावळ्या घालून देवास क्लब ग्राऊंडवर सकाळपासून उपस्थित झाले. विवाहासाठी मंडप आणि अन्य तयारीही करण्यात आली होती. मात्र वेळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशा नवऱ्या मुलींचा काहीच पत्ता लागला नाही. संध्याकाळ होऊनही मुली किंवा त्यांचे नातेवाईक न आल्याने तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

यानंतर संतप्त नवरदेव आणि त्यांच्या नातेवाईकांनी कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ घालत आरोपीविरोधात कारवाईची मागणी केली. “लग्नाच्या नावाखाली आमच्या भावना दुखावल्या गेल्या आणि लाखो रुपयांची फसवणूक झाली,” अशी प्रतिक्रिया पीडितांनी व्यक्त केली.

दरम्यान, फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध घेतला जात असून या प्रकरणातील इतर संबंधितांचीदेखील चौकशी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!