सिंदखेडराजा(बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील पिंपळगाव कुडा, लिंगा व देवखेड येथील रेतीघाट मागील काही दिवसांपासून सुरू झाले असून जऊळका गावातून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात आहे. मात्र, रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकांचा मनमानी कारभार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रेती वाहतूक करणारे टिप्पर चालक अतिवेगाने वाहन चालवतात. रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना कट मारणे, विरोध केल्यास अरेरावी करणे व धमकीची भाषा वापरणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जऊळका गावातील बसस्टँडजवळ रस्त्यावर वळण असल्याने त्या ठिकाणी टिप्परमधून मोठ्या प्रमाणात रेती खाली सांडते. त्यामुळे रस्ता घसरडा होत असून दुचाकीस्वार स्लीप होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीला टिप्परचा धक्का लागून ती जखमी झाल्याची घटना देखील घडली होती.
दरम्यान, काल एका टिप्पर चालकाने ऑटो रिक्षाला कट मारल्याने रिक्षा जवळपास टिप्परच्या खाली जाण्याची वेळ आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
परिसरातील पिंपळगाव कुडा, लिंगा व देवखेड या गावांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दुसरबीड येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. त्यामुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सकाळी व्यायामासाठी रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांनाही रात्रंदिवस सुरू असलेल्या टिप्पर वाहतुकीमुळे धोका निर्माण झाला आहे.
रेतीघाटाचे नियम धाब्यावर बसवून टिप्पर चालकांकडून रात्रंदिवस रेतीची वाहतूक सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याशिवाय रस्त्यावरून जाणाऱ्या टिप्परमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या सर्व प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन संबंधित टिप्पर चालकांवर कारवाई करावी व योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा येत्या काळात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.















