बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जळगाव जामोद तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी वडगाव पाटण येथील सुरेश शालिग्राम वावगे (वय ६०) याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी घरी खुर्चीवर बसून टीव्ही पाहत असताना आरोपी तिच्या जवळ आला व तिच्याशी अयोग्य वर्तन करून छेडछाड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरोपीला लाथ मारून स्वतःची सुटका केली.
घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर पीडितेची आई आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच पीडितेच्या शाळेजवळही जाऊन त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पीडितेच्या आईने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक २०५/२०२६ अन्वये बीएनएस कलम ७४, ७५, ७८, ३५२, ३५१ (३) तसेच पोक्सो कायदा कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.














