Advertisement Advertisement

मेहकर आगाराचा कारभार बेफिकीर ! आजारी चालक, ५ तास प्रवाशांची फरफट…

हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज) : “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या मेहकर आगाराच्या कारभाराने या वाक्यालाच अक्षरशः काळिमा फासल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

७ एप्रिल रोजी साखरखेर्डा येथून सकाळी ७ वाजता निघणारी मेहकर–पुणे बस (क्र. MH 40-V 5751) नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर हजर झाली. मात्र, बसचे चालक एस. एस. निकम यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांनी तत्काळ ही माहिती सहाय्यक वाहतूक निरीक्षक राकेश चौधरी यांना दिली. तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

पर्यायी चालक पाठवण्यात तब्बल उशीर झाला. सकाळी ११ वाजता एस. यू. घुबे हे चालक म्हणून हजर झाले आणि त्यानंतर बस पुण्याकडे रवाना झाली. या विलंबामुळे सुमारे ४० प्रवाशांना तब्बल ५ तास बसस्थानकावर थांबावे लागले, ज्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

आजारी असतानाही चालकावर ड्युटीचा दबाव?

चालक निकम यांनी प्रकृती अस्थिर असल्याची माहिती रात्रीच दिली होती, तरीही त्यांना ड्युटीवर ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नोकरी टिकवण्यासाठी चालकाने कर्तव्य बजावले, मात्र या प्रकारामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रवाशांना अक्षरशः वाऱ्यावर…

बस वेळेत हजर असूनही चालक आजारी पडल्याने प्रवासी ताटकळत राहिले. प्रशासनाकडून कोणतीही तत्पर मदत न मिळाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

प्रवाशांनीच दाखवली माणुसकी…

बसस्टॉपवर उपस्थित असलेल्या सर्जेराव मंडळकर यांनी पुढाकार घेत चालक निकम यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र, मेहकर आगाराकडून याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

प्रवाशांचा संताप..

“ही बस आमच्या भागासाठी महत्त्वाची सुविधा आहे. चालक आजारी असताना तातडीने पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी,” अशी मागणी व्यापारी ललितकुमार अग्रवाल यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!