Advertisement Advertisement

“१० टक्के कमिशन घ्या, पण शेतकऱ्याला हेक्टरी १ लाख द्या!” रविकांत तुपकरांनी सत्ताधाऱ्यांना भरसभेत सुनावलं; निमगावात दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारची पोलखोल!

निमगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):** दुष्काळाने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याऐवजी सत्ताधारी नेते त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात कमिशन मिळत नाही, त्यामुळे नेत्यांना या प्रश्नांत रस नाही. तुम्हाला हवे तर आमच्याकडून १० टक्के कमिशन घ्या; पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या आणि त्यासाठी क्षेत्राची कोणतीही मर्यादा ठेवू नका, असा जोरदार टोला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी १४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून सुरू झालेली रविकांत तुपकर यांची दुष्काळ संघर्ष यात्रा १५ नोव्हेंबर रोजी निमगाव येथे पोहोचली. यावेळी आयोजित जाहीर सभेत त्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना लोकप्रतिनिधी त्यांच्या मागण्यांसाठी पुरेशा ताकदीने आवाज उठवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

सभेच्या प्रास्ताविकात अॅड. गोपाल निमकर्डे यांनी निमगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिकांच्या विविध समस्या मांडल्या. महावितरणकडून अनियमित शेती वीजपुरवठा, राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळणारी कथित चुकीची वागणूक, पीककर्जमाफी व कर्ज पुनर्गठनातील अडचणी, पीकविमा कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने दावे फेटाळले जाणे, तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांचा त्रास अशा अनेक प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले.

याशिवाय जिगाव प्रकल्पातील पुनर्वसन व भूसंपादनाच्या समस्या, निमगाव येथे अद्यापही ग्रामीण रुग्णालयाची सुविधा उपलब्ध नसणे आणि गावात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणीही सभेत मांडण्यात आल्या. या सर्व प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी मंचावर निमगावचे सरपंच विकास इंगळे, उपसरपंच संजय इटखेडे, भगवान फरकाळे, मधुकरराव चरखे, शंकरराव गोंगे, शंकर कवळकार, समाधान पाऊलझगडे, श्रीकृष्ण कवडे, आझाद पठाण, वसीम राजा, संजय बोंबटकर, निलेश वाघमारे, धम्मपाल गायकवाड, अनिल धोटे, तुळशीराम चरखे, नंदूभाऊ काटकर, भरत काटकर, बाबुराव शिवलकर, बाबुराव आसलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!