दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज):ईदच्या पार्श्वभूमीवर दुसरबीड येथे उफाळलेल्या वादातून दोन गटांत झोंबाझोंबी होऊन सार्वजनिक शांतता भंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी सुमारे २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास ईदगाह बांधकाम व नामनिर्देशनाच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर लवकरच झोंबाझोंबीमध्ये झाले. दोन्ही गटांतील व्यक्तींनी एकमेकांवर धावून जात मारहाण केल्याने काहीजण जखमी झाले.या घटनेमुळे काही काळ परिसरातील शांतता भंग झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ धाव घेत हस्तक्षेप केला.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश वारकरी (वय ३५, रा. किनगाव राजा) यांच्या फिर्यादीवरून किनगाव राजा पोलिसांनी शेख नौशाद, शेख याकुब उर्फ नसीर, शेख जिलानी, शेख इमरान, शेख इरफानअली, जुनेद अली, शेख साजेद, शेख जाकेर यांच्यासह २० ते २५ अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार विष्णु मुंढे करीत आहेत.दरम्यान, परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारीचे उपाययोजना करण्यात येत आहेत.













