Advertisement Advertisement

फेसबुकवरील डबल पैशाचं आमिष भारी पडलं; तरुणाला शेतात नेऊन मारहाण, पोलिस असल्याची बतावणी करून लुटले…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – शेगाव तालुक्यातील एका गावात पैसे डबल करून देतो अशा दाखवत त्याने फसवणूक केल्याची सांगितले सोसियल मीडियावरील फेसबुक ‘करन्सी डबल’ या आमिषाला बळी पडलेल्या मध्यप्रदेशातील एका २२ वर्षीय तरुणाला सुनसान शेतात नेऊन मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून दुचाकीवरून फिर्यादीला शेतात नेले आणि जबरदस्तीने पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून एक मुख्य सूत्रधार फरार आहे.

फिर्यादी इंदकुमार मुरलीलाल यादव (वय २२, रा. देऊर, पोस्ट कटरा, तहसील देवरिया, जि. रेव्हा, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फेसबुकवरील ‘करन्सी डबल’ नावाच्या पोस्टवर विश्वास ठेवून त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. आरोपी विकास पाटील व त्याच्या साथीदारांनी एक लाख रुपये आणल्यास पाच लाख रुपये करून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी २७ फेब्रुवारी रोजी रात्री शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात आला असता आरोपींनी त्याला दुचाकीवर बसवून सुनसान शेत परिसरात नेले. तेथे आरोपींनी त्याला मारहाण करून त्याच्याकडील ४ हजार रुपये क्यूआर कोडद्वारे जबरदस्तीने काढून घेतले तसेच कुटुंबीयांकडून एक लाख रुपये मागवण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला गंभीर मारहाण केली. आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी फिर्यादीने संधी साधून घटनास्थळावरून पळ काढला व जवळील बंद फॅक्टरीच्या भिंतीजवळ रात्रभर लपून बसला. सकाळी त्याने मित्राला संपर्क करून संपूर्ण घटना सांगितली आणि शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.

पहाटेच पोलिसांचे ‘सर्च ऑपरेशन’; तीन आरोपी जेरबंद…

मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पीएसआय गजानन शिंदे व त्यांच्या पथकाने चिंचोली व गायगाव शिवारात पहाटे सर्च ऑपरेशन राबवले. या कारवाईत पंकज अशोक सोनोने (वय २६), कैलास प्रकाश हालेराव (वय २७) आणि विशाल रामदास शेलारकर (वय २१) या तीन आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, या गुन्ह्यातील एक मुख्य सूत्रधार अंधाराचा फायदा घेत पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३०८(३), ३१८(४), २०५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सोशल मीडियावरील आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन

दरम्यान, ‘पैसे दुप्पट करून देतो’ अशा सोशल मीडियावरील पोस्ट व आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन शेगाव ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना केले आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद पोस्ट किंवा व्यक्तींची त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असेही पोलिसांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!