Advertisement Advertisement

“शाळेत जाणाऱ्या लेकरामागे रोज मोटारसायकलवर फिरायचे; अश्लील इशारे करत धमक्या..! कुरणगाडात दोन तरुणांवर पोक्सोचा गुन्हा!”

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील कुरणगाड येथे शाळेत जाणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिला अश्लील इशारे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरणगाड येथील एक १५ वर्षीय मुलगी शाळेत जात असताना आरोपी रुपेश अंबदास गोतलकार आणि अमोल समाधान गोतलकार (दोन्ही रा. कुरणगाड) हे मोटारसायकलवरून तिचा रोज पाठलाग करत होते. एवढेच नव्हे तर मुलगी घरी असतानाही आरोपी घराच्या आसपास फिरत तिला त्रास देत होते. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता मुलगी घरासमोर असताना दोन्ही आरोपींनी तेथे येऊन तिच्याकडे अश्लील हातवारे व इशारे केले.

यावेळी मुलीने धाडस करून आरोपींना जाब विचारला. मात्र, “ही गोष्ट आई-वडिलांना सांगितली तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवे मारू,” अशी धमकी देत आरोपींनी तिच्या कुटुंबीयांना अर्वाच्च शिवीगाळ केली. घाबरलेल्या मुलीने ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

पीडितेच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८, ३५१ (३), ३५२, ३ (५) तसेच पोक्सो कायद्याचे कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!