Advertisement Advertisement

हिंदू समाजात फूट पाडणाऱ्यांपासून सावध राहा : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन…..

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या जन्मभूमीचा अभिमान असलेल्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात उद्भवलेला वाद अत्यंत दुर्दैवी व घृणास्पद असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली. संबंधित प्रकरणातील सर्व दोषींना तत्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी; मात्र निर्दोष नागरिकांना वेठीस धरू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोणार तालुक्यातील चिखला गावातील पीडित महिला संजीवनी वाघ यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, काही मंडळी जाणीवपूर्वक हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रवृत्तींपासून समाजाने सावध राहणे गरजेचे आहे.

ना. जाधव पुढे म्हणाले की, चिखला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी; मात्र अटकेच्या कारवाईत निरपराध लोकांना त्रास होता कामा नये. पीडित महिलेवर झालेला प्रकार निंदनीय असून, गावकऱ्यांनी समन्वय साधत शिवरायांचा पुतळा उभारणे आवश्यक होते. काहींच्या चुकीमुळे संपूर्ण राज्यभर गावाची बदनामी झाली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर करावीत, जेणेकरून भीतीपोटी गाव सोडून गेलेली कुटुंबे पुन्हा परत येऊ शकतील, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, काही राजकीय मंडळी भडकाऊ भाषणे देत जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत अशा प्रवृत्तींवर तातडीने अटकाव करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी आमदार संजय रायमूलकर, आ. सिद्धार्थ खरात, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने, संतोष मापारी, दिलीपराव देशमुख, शिव पाटील तेजनकर, राजूभाऊ काटे, गजानन मापारी, पांडुरंग सरकटे, सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण दळवी, तालुका अध्यक्ष विशाल पाटील जंजाळ, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!