बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)डीजे संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक बँड पथकांवर उपासमारीची वेळ ओढवली असून, आपल्या हक्कासाठी बँड कलाकारांनी अखेर रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले. शिवसेना शिव लहू सेना संघटनेच्या नेतृत्वात सोमवार, २३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी शिवसेना नेते विजय अंभोरे, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, श्रीकृष्ण शिंदे, दादाराव महाले, बाळासाहेब बोदडे, विजय पारेकर, लक्ष्मणराव गवई, सोपानराव पानपाटील, कडू हिवाळे, तेजराव बाजोडे, दिगंबर पाटोळे, गजानन पवार, भगवान गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिजामाता प्रेक्षागारापासून वाद्यांच्या गजरात मोर्चा काढत कलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आंदोलनादरम्यान धार्मिक व देशभक्तीपर गीतांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी विजय अंभोरे यांनी इशारा देताना सांगितले की, “जोपर्यंत लोककलावंतांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे.”
प्रमुख मागण्या काय?
वृद्ध बँड कलाकारांना लोककलावंताचा दर्जा देऊन शासकीय मानधन द्यावे…
बँड पथकांना किमान १० लाख रुपयांचे अनुदान द्यावे…
हलगी, सनई, तुतारी वादकांना मानधन व सन्मान मिळावा…
कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव करावा…
बँड वाहनांवरील आरटीओ व पोलीस प्रशासनाची अडवणूक थांबवावी…
या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो बँड कलाकारांनी सहभाग घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. आता शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















