चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज):महाराष्ट्राच्या राजकारणात प्रशासनावर मजबूत पकड, निर्णयक्षमता आणि जनतेशी थेट नातं जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी चिखली येथे भावनिक वातावरणात सद्भावना व गौरव सभा पार पडली.
आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता चिखली येथील शिवाजी कला मंदिर, शिवाजी हायस्कूल येथे ही सभा संपन्न झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या राजकीय वाटचालीचा, विकासाभिमुख दृष्टिकोनाचा आणि जनतेसाठी अखंड झटणाऱ्या कार्यपद्धतीचा गौरव केला.
यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “राजकारणाची जाण आणि सामाजिक भान असलेले दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. त्यांची कार्यपद्धती, प्रशासनावरील पकड आणि सर्वसामान्यांशी असलेली आपुलकी कायम प्रेरणादायी राहील….
सभेदरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांनी अजितदादांसोबतचे अनुभव सांगत त्यांच्या ठाम निर्णयशक्तीचा आणि विकासासाठी घेतलेल्या धाडसी भूमिकेचा उल्लेख केला. राज्याच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेली वेगळी ओळख आजही अनेकांसाठी मार्गदर्शक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
सभेच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी सद्भावना व्यक्त केली. संपूर्ण सभागृहात आदर, भावना आणि कृतज्ञतेचे वातावरण दिसून आले.
या सभेला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोन्द्रे, माजी जि. प. अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, शिवसेना नेते श्रीराम झोरे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष शंतनू बोन्द्रे, मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, भाजपा उपजिल्हाध्यक्ष देविदास जाधव, भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















