खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): विनयभंगाच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या राधेश्याम रामकृष्ण ठाकरे (वय २६) याला जळगाव जामोद प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच एकूण सहा हजार रुपये दंड ठोठावून त्यातील पाच हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पीडितेने २४ जून २०१४ रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सायंकाळी शौचास जात असताना आरोपीने वाईट उद्देशाने तिचा हात धरून विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तसेच आरोपी काही महिन्यांपासून तिचा वाईट उद्देशाने पाठलाग करीत असल्याचाही आरोप करण्यात आला होता.
या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ (ब), ३५४ (ड) आणि ४५२ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान अभियोग पक्षाने एकूण सहा साक्षीदार तपासले.
साक्षीदारांची साक्ष, उपलब्ध पुरावे आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता अजय ज. इंगळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३५४ (ब) आणि ३५४ (ड) अंतर्गत दोषी ठरविले. दोन्ही कलमांखाली प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
दंडाच्या एकूण सहा हजार रुपयांपैकी पाच हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रीती मेंढे यांनी १९ ऑगस्ट रोजी हा निकाल सुनावला.













