Advertisement Advertisement

आई मेली, पण अंत्यसंस्काराला जागा मिळेना! अंध अन् भूमिहीन लेकरानं रस्त्यावरच आईला दिला अखेरचा निरोप….

दाताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : स्वातंत्र्य आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी संतापजनक घटना मलकापूर तहसील अंतर्गत गणवाडी येथे समोर आली आहे. गावात हक्काची स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने एका वृद्ध महिलेवर चक्क रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, मृत महिलेचा मुलगा अंध असून त्याच्याकडे स्वतःची जमीनही नाही. त्यामुळे आईला अखेरचा निरोप देण्यासाठी या कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागला.

गणवाडी येथील रहिवासी प्रल्हाद निवृत्ती तायडे यांच्या मातोश्री कुसुमबाई निवृत्ती तायडे यांचे २० ऑगस्ट २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सकाळी ११ वाजता अंत्यसंस्काराची वेळ ठरविण्यात आली होती. मात्र, पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे कुठे, हा गंभीर प्रश्न नातेवाईकांसमोर उभा राहिला.

गावातील स्वतःची शेती असणारे नागरिक त्यांच्या शेतजमिनीमध्ये अंत्यसंस्कार करून घेतात. मात्र, नाभिक समाजातील प्रल्हाद तायडे यांच्याकडे स्वतःची जमीन नाही. त्यातच ते अंध आहेत. त्यामुळे आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात हक्काची जागा उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे ठाकले.

अखेर रस्त्यावरच रचली चिता

अंत्यसंस्कारासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध न झाल्याने गावकरी आणि नातेवाईकांनी गणवाडी-खामखेड रस्त्याच्या कडेला चिता रचली. याच ठिकाणी कुसुमबाई तायडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईला सन्मानाने अखेरचा निरोप देण्याची इच्छा असलेल्या अंध मुलाच्या वाट्याला आलेले हे दृश्य उपस्थितांच्या काळजाला चटका लावून गेले.

जिवंतपणी गरिबीशी झुंज देणाऱ्या एका वृद्ध महिलेला मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी साधी जागाही मिळू नये, ही परिस्थिती गावातील मूलभूत सुविधांचा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

गावात स्वतंत्र आणि व्यवस्थित स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असतानाही गणवाडीसारख्या गावात नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी रस्त्याचा आधार घ्यावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. विकासाच्या घोषणा आणि कागदोपत्री योजनांच्या पलीकडे जाऊन नागरिकांना मूलभूत सुविधा कधी मिळणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

एका अंध आणि भूमिहीन मुलाला आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळू नये, ही केवळ एका कुटुंबाची व्यथा नसून गावातील मूलभूत नागरी सुविधांकडे झालेल्या दुर्लक्षाचे विदारक उदाहरण असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. गणवाडी येथे तातडीने अधिकृत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देऊन आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!