देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका गावात महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला विरोध करणाऱ्या व्यक्तीवर दगडाने हल्ला करून त्याला जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास महिला आपल्या घरी असताना आरोपी अभिजीत अनिल सरकटे तेथे आला. त्याने वाईट उद्देशाने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड सुरू केली.
महिलेचा आवाज ऐकून एक व्यक्ती घटनास्थळी धावत आला व त्याने आरोपीच्या कृत्याला विरोध केला. याचा राग आल्याने आरोपीने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर घटनास्थळी पडलेला दगड उचलून संबंधित व्यक्तीच्या पायावर मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर महिलेने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अभिजीत अनिल सरकटे याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या आदेशाने या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक नितीन मिंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच १५ ऑगस्ट रोजी रात्रीही पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्याची नोंद आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.













