Advertisement Advertisement

ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होणार? बुलढाण्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली; आतापर्यंत सरासरीपेक्षा १४.२ टक्के अधिक पाऊस….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पाणीसाठे, नद्या-नाले आणि खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात जून ते ३ ऑगस्टदरम्यान अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत १४.२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर काहीसा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार बुलढाणा जिल्हा पांढऱ्या-पिवळ्या संक्रमण पट्ट्यात येत आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिन्याभरात पावसाचे मोठे खंड पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला असला, तरी पुढील काळातील पावसाचे वितरण शेतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

जुलैच्या पावसाने जूनची तूट भरून काढली…

जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जूनमधील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली. परिणामी, जून ते ३ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात अपेक्षित पर्जन्यमानापेक्षा सुमारे १४.२ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

एकूण पर्जन्यमान समाधानकारक असले तरी पावसाचे असमान वितरण आणि आगामी काळात पडू शकणारे खंड हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. विशेषतः खरीप पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाचा मोठा खंड पडल्यास पिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

हवामानाच्या रंगछटांवरून घाबरू नका….

ऑगस्ट महिन्यासाठी हवामान विभागाच्या अंदाजात दिसणाऱ्या रंगछटांवरून निश्चित निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. पिवळा रंग कमी पावसाची शक्यता दर्शवितो, तर पांढरा रंग कमी, सामान्य किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यताही दर्शवू शकतो. त्यामुळे केवळ दीर्घकालीन अंदाजाच्या आधारे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

पिकांचे व्यवस्थापन ठरवणार उत्पादन….

पावसाचा संभाव्य खंड लक्षात घेता शेतकऱ्यांनी आतापासूनच पीक व्यवस्थापनावर भर देण्याचा सल्ला कृषी हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. शेतातील ओलावा टिकवण्यासाठी योग्य वेळी आंतरमशागत करावी, शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच पावसाच्या उपलब्धतेनुसार सिंचनाचे नियोजन करावे.

यासोबतच खत व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रणाकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. स्थानिक हवामानाचा अंदाज, जमिनीतील ओलावा आणि पिकांची अवस्था लक्षात घेऊन निर्णय घेतल्यास संभाव्य नुकसान कमी करता येऊ शकते.

परिस्थितीवर लक्ष ठेवणे गरजेचे…

ऑगस्टमध्ये पावसाचा अंदाज काहीसा कमकुवत असला, तरी संपूर्ण महिना प्रतिकूल राहील, असे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवा किंवा केवळ दीर्घकालीन अंदाजावर अवलंबून न राहता स्थानिक हवामान अंदाजानुसार पीक व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांना मोठा आधार मिळाला असून, आता ऑगस्टमधील पावसाचे वितरण आणि खंड याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!