बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा शहरातील आठवडी बाजार परिसरात भाजीपाला विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून लसूण व रोख रक्कम जबरीने लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मनोहर उर्फ लहान्या कैलास पवार (वय ३१, रा. बुलढाणा) याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यातील मुद्देमालही हस्तगत केला आहे.
चाकूचा धाक दाखवत लसूण आणि रोकड हिसकावली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुम्मी येथील रहिवासी व भाजीपाला विक्रेता रेखा दिनकर नरोटे या २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता बुलढाणा शहरातील आठवडी बाजारात मंडीसमोरील गेटजवळ मालवाहू वाहनाजवळ काम करत होत्या.
यावेळी आरोपी मनोहर उर्फ लहान्या पवार तेथे आला. त्याने चाकूचा धाक दाखवत वाहनातील २ हजार ४०० रुपये किमतीचे १६ किलो लसूण जबरीने घेतले. तसेच फिर्यादीच्या पतीच्या शर्टच्या खिशातील २ हजार रुपये रोख रक्कमही बळजबरीने हिसकावून घेतली.
यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पतीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला.
शहर पोलिसांची तातडीने कारवाई
या घटनेनंतर रेखा नरोटे यांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी मनोहर उर्फ लहान्या कैलास पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यातील १६ किलो लसूण आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलिसांकडून सुरू आहे.













